Kolhapur Ambabai: कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा
महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेली श्री क्षेत्र करवीर निवासीनी श्री देवी महालक्ष्मी अंबाबाईविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. माता सतीचे ज्या ठिकाणी 3 डोळे पडले तिथे हे शक्तिपीठ आहे. म्हणूनच परम शक्ती तीन वेगवेगळ्या रूपात येथे वास्तव्य करत असल्याचे म्हटले जाते.
दरदिवशी देवीचा श्रृंगार केला जातो. शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. सोमवारी अंबाबाईने सरस्वती देवीच्या रूपात अवतरीत होऊन भक्तांना आशीर्वाद दिले.
श्री सरस्वती ही सत्त्वगुणप्रधान, ज्ञान, बुद्धी, वाचा, विद्या, कला संगीत, शिक्षणाची अधिष्ठात्री आहे. ऋग्वेदात सरस्वती देवीला अनेक स्तोत्रे समर्पित केली आहेत. जी कुंदपुष्प, चंद्र आणि मोत्यांच्या हाराप्रमाणे शुभ्र आहे. जिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. जिच्या हातात श्रेष्ठ अशी वीणा आहे. जी श्वेत कमलासनावर बसली आहे. जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सदैव वंदनीय आहे. अशी आख्यायिका आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईची आख्यायिका
श्री क्षेत्र करवीर निवासीनी श्री देवी महालक्ष्मी अंबाबाईची एक आख्ययिका सांगितली जाते. कोलहासुर नावाचा राक्षस देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले. कोलहासूरने जोरदार लढा दिला. भगवान शंकर कोलहासुराच्या युद्धकौशल्याने प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची इच्छा विचारली. पुढे कोलहासुराने विनंती केली की, 'महादेव माझ्यावर कोपू नका. मला असा वर द्या की आदिशक्तीने महालक्ष्मीच्या रूपात 18 हातांनी मारावे.'
शेवटी देवी महालक्ष्मीने आश्विन शुद्ध पंचमीला कोलहासुराचा वध केला. पुढे, मृत्यूशय्येवर असताना, कोलहासुराने तीन इच्छा मागितल्या. प्रथम, या प्रदेशाला माझे नाव देणे. दुसरा, हा प्रदेश गया तीर्थक्षेत्राप्रमाणेच पवित्र तीर्थक्षेत्र असावा. तिसरे, दरवर्षी तुम्ही माझ्यासाठी एक भोपळा मारला पाहिजे. त्यामुळे या प्रदेशाला कोल्हापूर असे नाव पडले. अशी आख्ययिका प्रचलित आहे.